राज्यभरातील बहुतांश कॉलेजे आणि विद्यापीठे यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना भरतीची प्रक्रिया पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू करू नये, अशी सूचना कुलपती, तथा राज्यपाल यांच्या कार्यालयातून विद्यापीठांना देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठे, कॉलेजांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.विद्यापीठाच्या शिक्षकांची निवड करण्यासाठीच्या समितीवर कुलपतींनी नियुक्त केलेल्या सदस्याची नेमणूक करावी, अशी विनंती करणारी पत्रे अनेक विद्यापीठांनी कुलपतींकडे पाठवली होती. त्यावर उत्तर म्हणून हे पत्र पाठवण्यात आले आहे. भरती प्रक्रिया थांबल्याने काही कॉलेजे व विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.
विद्यापीठांमधील शिक्षकांची निवड करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाकडून एक समिती स्थापन केली जाते. या समितीतील एक सदस्य कुलपतीनियुक्त असतो. या सदस्याची नेमणूक करावी आणि समिती स्थापन करण्याची परवानगी द्यावी, यासाठी अनेक विद्यापीठांनी कुलपतींकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या विनंतीपत्रांवर काहीच निर्णय झाला नव्हता.
आता आचारसंहिता संपल्यावर या विनंतीपत्रांचा विचार होऊन कुलपतींकडून सदस्याची नेमणूक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कुलपतींच्या कार्यालयातून २६ नोव्हेंबर रोजी राज्यपालांच्या मुख्य सचिवांच्या सहीने विद्यापीठांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत निवडसमितीची स्थापना आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया स्थगित करावी, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. यामुळे विद्यापीठांमध्ये सुरू असलेली शिक्षक, सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, कुलसचिव, उप कुलसचिव आदी पदांची नियुक्ती प्रक्रिया स्थगित झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीपासूनच या विद्यापीठांनी ही प्रक्रिया सुरू केली होती. मुंबई विद्यापीठातही सहायक प्राध्यापक, प्राध्यापक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. आता विद्यापीठांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
The post appeared first on .